कोकणातील मुलींना हवाय शहरी चाकरमानी


*माका चाकरमानी घोव व्हयो !*

कोकणात बनलीय एक सामाजिक समस्या.

……………………….

 

कोकणातील स्थानिक मुलांबरोबर मुली लग्न करायला तयार नाहीत. त्यांना चाकरमानी घो हवो. त्यामुळे सध्या ही मुलं कर्नाटक व इतर राज्यात जाऊन मुली शोधण्यासाठी वण वण फिरतात. सिंधुदुर्गात ही अवस्था फ़ार बिकट आहे. काहींजण तर अनाथाश्रम मध्ये जाऊन एखादी मुलगी लग्नासाठी पसंतीस पडते का ? याचा शोध घेत असतात. काहींनी तर परराज्यातील मुलीशी विवाह केलेले आहेत.

अनेक स्थानिक अविवाहित तरुण आपलं लग्न जमत नाहीत म्हणून चिंतेत असल्याचे दिसते.

याबाबत एका वृत्तपत्रात आलेली बातमी वाचनात आली. आणि कोकणची भीषण वास्तवता डोळ्यासमोर आली.

 

कोकणात अशी परिस्थिती का ओढवली ? कोकणचा विकास झाला म्हणून गप्पा मारणाऱ्यांनी या भीषण वास्तवतेच डोळे खोलून अभ्यास करणे गरजेचे आहे.

 

कोकणातील घराघरातील शेतकरी यांच्या बायकांची अवस्था अटळ असते. गावी त्या एकटीने नवरा,सासू-सासरे ,दिर ,नणंदा, मुले आणि त्यांच्या बरोबर शेती,भाती,घरदार,परडे परसु, गुरेढोरे सांभाळीत दिवस काढावे लागतात. कोकणातील कामकरी स्त्रीचे मूळचे रूप ही परिस्थिती विद्रूप करून टाकते आणि काळी सावळी,उन्हात रापलेली, केसांना तेल नसलेली, अंगावरील गोडसपणा हरवलेल्या एका ओबड, धोबड स्त्रीचे रूप डोळ्यासमोर प्रातिनिधिक स्वरूपात उभे राहते.

ही कहाणी कोकणातल्या घरोघरच्या बायका स्वतः अनुभवत असतात. या बायकांचे जिणे अधिकच खडतर असते. कोकणातील तटपुंजी शेती – भात, नाचणी, कुळीथ नि वरी,असली भरपूर कष्ट करूनही पुरेसा गल्ला न देणारी पिके.त्या साठी वर्षाचे बाराही महिने रणरणत्या उन्हात आणि मुसळधार पावसात धड्पडावे लागते. निसर्गाने साथ दिली तर, कुठे सात -आठ महिने धान्य पुरते. दुसऱ्याच्या कामाला पैरे म्हणून नेहमीच जावे लागते. काही जण तर पैऱ्यांची मजुरी परडवत नाही म्हणूंन स्वतःच कामें करतात.

 

ही काबाडकष्ट करणारी स्त्री विनयशील आहे पण ती अधिक बुद्धिमान आहे. कोकणच्या सानिध्यातील सागराच्या लाटांचे विभ्रम आणि सह्याद्रीच्या कडेकपारींचा कणखरपणा तिच्यात टिकून आहे. परंतु आता शिक्षण, टीव्ही, फ़ेस बुक, व्हाटसाप सारख्या बदलत्या आधुनिक तंत्रज्ञान काळानुसार ही स्त्री बदलत आहे आणि तिला व तिच्या मुलांना मुंबईचे आकर्षण वाटू लागले आहे.

 

मुंबईची पडछाया कोकणातील प्रत्येक गावी पडलेली असते.

आपला चुलता,दिर मुंबईला गेला. त्याने स्वतःच्या मुलांची प्रगती केली. त्यांची मुले गल्लेलोट पगार घेतायेत. काहींची मुले,सुना या परदेशात पोचली. पण आपले पती, वडील येथे घरदार व शेती सांभाळत राहिले आपली प्रगती झाली नाही याची खंत गावात शेती करीत राहिलेल्या कुटंबात व्यक्त होत असताना दिसते. मुंबईत स्वताची हक्काची जागा नाही. हे शल्य या कुटुंबात आजही आहे. मुंबईतील वडिलोर्पजीत जागा चाकरमान्यानाने हडप केल्याच्या काहींच्या तक्रारी ऐकायला मिळत आहे. गावात शेती करण्यासाठी राहिलेल्या शेतकऱ्याला आपली पत्नी व मुलांकडुन टोमणी ऐकावी लागतात. याला काही अपवाद आहेत आजही काही चाकरमानी आपल्या गावच्या भावाला सांभाळत असले तरी परावलंबी असल्याची भावना शेतकरी कुटुंबात व्यक्त होत आहे.

आपण गरीब राहिलो ही खंत त्यांना सतावतेय. वडिलांनी केलेली घोडचूक आपण पुन्हा करायची नाही. त्यामुळे येथे न राहता मुंबईला जायच,असा या मुला- मुलींनी पक्का निर्णय घेतला आहे.

आता गावी शिक्षणाच्या सोयी-सुविधा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मूल,मुली पदवी पर्यंत शिकलेली आहेत.जी काही मुले सध्या गावी राहतात. ती मुले शेती, छोटे उद्योग व्यवसाय करतात. त्यांच्या बरोबर येथील मुलीं लग्न करायला तयार नाहीत. या शिकलेल्या मुलींना शेतात राबायच नाही. लग्न झाल्यावर एखाद्या खेडेगावात राहून सासरचे जीणे जगायची इच्छा नाही. अशी त्यांची मानसिकता तयार झाली आहे. त्यांना शहरी जीवनाचे आकर्षण वाटू लागले आहे.म्हणून या मुलीं येथील मुलांबरोबर लग्न करायला तयार नाहीत.

Advertisement

या मुलींच्या गरजा वाढल्या आहेत. त्यांना मुंबईचा चाकरमानी घोव हवा आहे. मुंबईत जाऊन नोकरी करून पतीला मदत करायची.अशी तिने आपल्या संसाराची अनेक स्वप्ने रंगवली आहेत. हा खाजगी आणि व्यक्तिगत विषय असला तरी

त्यामुळे स्थानिक मुलांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाल्याने ती एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.

 

शेजारच्या घरांना लागलेली टाळी पाहून त्यांचे मन भरभिरतेय. मुंबईवरून गावाकडे आलेल्या चाकरमान्यांचा प्रभाव येथील लोकांवर पडत असतो.गावाला आलेला चाकरमानी आणि त्यांच्या मुलांचा रुबाब, थाट , राहणीमान पाहून आपण दारिद्र्यात तर जगत नाही ना? अशी भावना येथील शेतकरी कुटुंबात निर्माण होत असते.

कोकणातील तरुणांनो गावीच राहा,.कामधंदा तेथेच करा .असे फुकटचे भाषण ठोकणारे आणि सल्ले देणारे आपल्याकडे बरेच आहेत. पण येथे सुशिक्षित मुलाच्या हाताला काम आहे का ? निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे.परंतु राज्यकर्त्यांच्या निष्क्रियते मुळे फळप्रक्रिया,कृषी व पर्यटन आधारित उद्योग आले नाहीत. दंडवतेसाहेबांच्या कृपेने कोकणात रेल्वे आली आणि सरकारच्या निधीतून रस्ते डांबरी झाले .एवढ सोडलं तर कोकणात विकास झाला तो कोणता ? हा संशोधनाचा भाग आहे.

आजही सिंधुदुर्गातील आजारी लोक गोवा बांबोळी किंवा कोल्हापूर येथे जाऊन उपचार घेत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन अद्याप उपलब्ध नाही. गेल्या ५० ते ६० वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती अजूनही तीच आहे.येथे कारखाने नाहीत. इतर विभागासारखे उन्हाळी शेतीला पाणी नाही.दीडशे इंच पाऊस पडूनही उन्हाळयात नदी व विहिरी कोरड्या पडतात. सात-बारा उताऱ्यावरील हिस्सेदारांची डझनभर नावांच्या भानगडी आहेतच. मुंबईचा चाकरमानी गावाला काहीतरी करूया. म्हणतो तेव्हा गावाचा भाव नाय बोलतो आणि गावचा भाऊ करूया बोलतो तेव्हा मुंबईचा नाय बोलतो अशी अवस्था कोकणात असल्याने शासनाची 100 टक्के फलोद्यान योजना आपल्या पडीक जमिनीत अनेकजण राबवू शकले नाहीत. त्यात आणखी

मुंबईत येऊन स्थिर झालेला चाकरमानी पुन्हा गावाकडे वळून आपले ७/१२ मध्ये नाव आहे का हेही तपासू लागला आहे. जो भाऊ घरदार,शेती गुरे, ढोरे सांभाळण्यासाठी गावी राहिला. त्या भावाला जमिनीतील थोडासा जास्त हिस्सा सोडायची मानसिकता काहींमध्ये राहिलेली नाही. मात्र मुंबईत कमाविलेलं थोडस सोडायला चाकरमानी तयार नाही.अशा विविध कारणांमुळे ही परिस्थिती आपल्यावर उदभवू नये म्हणून येथील शेतकऱ्यांच्या मुली स्थानिक मुलांबरोबर लग्न करायला तयार नाहीत.

त्याना मुंबईचा नवरा हवा आहे. कोकणची अर्थव्यवस्था आजही चाकरमान्यावर अवलंबून आहे.चाकरमाण्यांनी गावाकडे जावे आणि खिसे खाली करून मुंबईत परतावे ,असे चक्र गेले कित्येक वर्षे चालत आले आहे?कोकणात कमवायचे साधन नाही.शेतीला भाव नाही.निसर्गाचा भरवसा नाही.या मुळे गावचा शेतकरी पिचला आहे. कोकणातील शेतकरी कर्ज घेत नाही,असे बोलले जाते.पण आताच्या नव्या आकडेवारी नुसार कोकणात एक लाख पेक्षा शेतकरी कर्जाचे थकबाकीदार आढळले आहेत.

  1. कोकणातील माणूस सरकारच्या भरवशावर राहत नाही.. सरकार देईल आणि मी करेन या आशेवर कोकणी माणूस राहिला नाही. गरिबीला कंटाळलेले कोकणी माणूस थेट मुंबईत आला आणि आपली प्रगती केली. जो पर्यंत कोकणात प्रदूषण विरहित कारखाने होत नाहीत. तो पर्यंत मुंबईकडे येण्याचा ओघ तसाच राहणार आहे. तो कोण थोपवू शकणार नाही. येथील मुलींनी आपल्या भविष्याची आखणी केली आहे. मुंबईत येऊन पतीला साथ देत नोकरी करायची, चाकरमाण्यां सारखे पैसे कमवायचे येथे स्थिर होत गावाकडे ही लक्ष द्यायचे .अशी मानसिकता कोकणातील मुलींची झाली आहे.

 

हे जरी खर असलं तरी स्थानिक तरुणांशी मुली लग्न करायला तयार नाहीत. ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे त्याचे काय?

-अभिमन्यु कद्रेकर.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »